
द लिजेंड ऑफ बहिर्जी-नाईक - पन्हाळ्याचा वेढा
Share
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रसिद्ध गुप्तहेरांच्या महान कारवायांची आणि मराठा साम्राज्याच्या उदयाची
कहाणी
द लिजेंड ऑफ बहिर्जी-नाईक
पन्हाळ्याचा वेढा (पुस्तक दुसरे)
लेखक: श्रेयस भावे
अनुवाद: योगिता रिसबूड
मूल्य: रु.४५०
दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे
पृष्ठसंख्या: ३१०
शेरलॉक होम्स, करमचंद जासूस यांच्या सुराग हाताशी लागल्यावर रहस्य उलगडणाऱ्या रोमांचकारी कथा
आपण अनेकांनी लहानपणी ऐकल्या-वाचल्या असतील. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारात
सर्वात महत्त्वाचं असलेलं गुप्तहेर खातं आणि त्यातील कसलेले गुप्तहेर यांच्या साहसकथा त्यामानाने कमी
ऐकल्या-वाचल्या असतील. त्या गुप्तहेर खात्यात गुप्तहेर कसे तयार केले जात, मुख्य हेराच्या जबाबदाऱ्या,
त्यांचा हजरजबाबीपणा, अचाट धाडस, युक्त्या-प्रयुक्त्या, पकडले गेलो तर काय भूमिका घ्यायची, अत्यंत
चिकाटीनं शेवटच्या श्वासापर्यंत तग धरून राहणं, वेळ पडल्यास बलिदान द्यायला मागंपुढं न पाहण्याचं धाडस
हे सगळंच वाचनीय आहे. अत्यंत जिकिरीच्या अशक्यप्राय मोहीम आखणं आणि त्यातून आश्चर्यकारक परिणाम
साधण्याचं अचाट काम पाहता या गुप्तहेरांचं साहस काहीवेळा अचंबित करणारं, तर काहीवेळा त्यांना हे कसं
सुचलं असेल असा प्रश्न मनात येऊन जाईलस आहे.
हेरखात्याचं काम फक्त शत्रू पक्षातील माहिती आणणं आणि आपल्या वरिष्ठाला सांगणं इतकं मर्यादित नव्हतं.
तर आपल्या राजाप्रति आणि राज्याप्रति आपलं कर्तव्य पूर्ण करणं या ध्येयानं पछाडलेले ते हेर होते. शिवाजी
महाराजांनी आपले मालक आदिलशाह यांच्यापासून आपण स्वतंत्र जाहीर करून लोकांचे आणि लोकांसाठी
असलेलं स्वराज्य स्थापन करण्यासाठी घेतलेले अतोनात कष्ट यातून मराठा साम्राज्य उभं राहिलं, त्याचा
केंद्रबिंदू होते सर्वसामान्य शेतकरी जे युद्ध-लढायांवेळी मावळे बनून शिवाजी महाराजांवर जीव ओवाळून
टाकायला तयार असत. आपली रयत आपल्या राज्यात सुखा-समाधानानं राहिली पाहिजे यासाठी जीवापाड
त्यांची त्यांच्या जनावरांची-पिकांची, मुलाबाळांची-विशेषतः स्त्रियांची काळजी वाहणारा हा राजा
मावळ्यांच्या तनामनात वास करून होता. प्रसंगी आपला जीव धोक्यातच नाही तर जीव दिलेले मावळेही
आपल्याला माहिती आहेत. त्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे हेरखातं.
लेखक श्रेयस भावे अगदी प्रामाणिकपणे जी भूमिका मांडतात ती अत्यंत रास्त आणि कौतुकास्पद आहे. जगात
निरनिराळ्या भागात अगदी थोडे असे राज्यकर्ते होऊन गेले, ज्यांचं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांइतकेच
रोमांचक होते, त्यांच्या आयुष्यावर अनेक इतिहासतज्ज्ञांनी विस्तृत लिहिले आहे. प्रत्येक मराठी मूल
महाराजांच्या या रोमांचक कथा ऐकत लहानाचं मोठं होतं, ही वस्तुस्थिती आहे. तथापि, हा अलीकडचा म्हणजे
१७ व्या शतकात घडलेला इतिहास अभ्यासताना काही समस्या जाणवतात त्या म्हणजे ज्या काळात नोंदी
ठेवण्याची पद्धत सुरू झालेली होती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हातांनी लिहिलेली पत्रं विविध ठिकाणी
उपलब्ध आहेत, बहिर्जी यांचं अस्तित्व सह्याद्रीत - लेखकाच्या शब्दात सांगायचं तर हिवाळ्यात पडणाऱ्या
धुक्याइतकं क्षणिक आहे. पण, पारंपरिक पोवाड्यांमधून त्यांच्याबद्दल सांगितल्या गेलेल्या शेकडो गोष्टींमुळे
आपल्याला हे निश्चित माहिती आहे की ते होते. त्यामुळं बहिर्जी नाईकवर लक्ष केंद्रित करण्यामागे लेखकाचा हेतू
फक्त या धूसर व्यक्तिमत्त्वाला ठळक करणे इतकंच नाही तर शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या
घटनांना स्पष्ट करणं हादेखील आहे.
शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या चार महत्त्वाच्या घटना आहेत. ज्यांना थोडा फार शिवाजी महाराजांचा
इतिहास पाठ्यपुस्तकात वाचून किंवा खास त्यांच्यावरची पुस्तकं वाचून माहिती असेल त्यांना बहिर्जी नाईक
नक्की माहिती असतील. हेरखात्याचे प्रमुख या नात्यानं त्यांनी महाराजांच्या अनेक मोहीमा यशस्वीरित्या पार
पाडल्या होत्या. पहिली घटना १६६० साली पन्हाळगडाला पडलेला वेढा, जेव्हा त्यांनी शरणागती पत्करावी
म्हणून पाठवलेल्या प्रचंड आदिलशाही फौजेच्या मजबूत वेढ्यातून राजे निसटले होते. दुसरी, १६६१ ची
उंबरखिंडीची लढाई. जेव्हा सह्याद्रीतील लहानशा खिंडीत छोट्याशा मराठा मावळ्यांच्या तुकडीने मोठ्या
संख्येने असलेल्या मुघल सैन्याचा पराभव केला होता. तिसरी १६६४ साली मुघलांची आर्थिक राजधानी
असलेल्या सुरतवर छापा. आणि चौथी १६६६ साली औरंगजेबाच्या दरबारातून आग्र्याहून सुटका ही त्यातील
एक अत्यंत महत्त्वाची घटना. या मोहिमेबद्दल वाचताना अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहतात, विज्ञान-
तंत्रज्ञानानात मानवाने अजून तेवढी प्रगती न केलेल्या त्या काळात भूगोलाचा इत्यंभूत अभ्यास करून
महाराजांना राजगडावर आणणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नव्हती.
लेखक श्रेयस भावे यांचं द लिजेंड ऑफ बहिर्जी-नाईक या मालिकेतील पन्हाळ्याचा वेढा हे दुसरं पुस्तक
आहे. लेखकाच्या या मालिकेतील पहिल्या पुस्तकाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर… पहिलं पुस्तक सुरतेवर
छापा. (ज्याबद्दल अनेक उलटसुलट चर्चा नेहमीच होत असतात. असो.) साधासुधा गुराखी असलेला शशीध्वज
आणि त्याचा मित्र विचित्र यांना गुप्तहेर म्हणून कसं घडवले जातं, या कथेबरोबरच मुघलांच्या आक्रमणामुळे
स्वराज्य दुर्बल झालेल्या काळात शत्रुच्याच पैशांनी स्वराज्याचा खजिना पुन्हा भरायचा असं राजांनी ठरवलेलं
असतं. त्या काळी सर्वात श्रीमंत असणारं आणि व्यापारी बंदर असलेल्या सुरतेत त्यांना शिरायचं असतं.
शहरातील प्रत्येक मोठ्या धनसाठ्याची माहिती काढण्याच्या उद्देशाने बहिर्जी बांदल आणि शशीध्वज सुरतला
जातात, भिकाऱ्याच्या वेशातील सदाशिव नाईक तिथे आधीच पोहोचलेले असतात. विलक्षण हिकमतीनं हे गुरु
शिष्य गुप्तहेर म्हणून काम फत्ते करतात. भरलेल्या तिजोऱ्या आणि स्वराज्याचं अस्तित्व टिकणार याची खात्री
करून ते परत जातात, परिणामतः शशिध्वजला अधिकृतपणे गुप्तहेर संघटनेत घेतलं जातं. मात्र मराठ्यांच्या या
बंडाचा बदला घेण्यासाठी मुघल बादशहाने प्राणघातक योजना आखलेली असते, यातूनच पुढे पन्हाळ्याला वेढा
घातल्याची घटना घडते. मात्र शशिध्वज आपल्या गुरुचा अस्सल चेला; नवीन साहसासाठी नव्या जोमानं तयार
होतो. पहिल्या पुस्तकात कहाणी इथपर्यंत येते आणि पुढे जे घडतं ते दुसऱ्या पुस्तकात अत्यंत प्राण कंठाशी
आणून आपण वाचक, वाचताना जणू १६६५ सालात पोहोचतो.
साल १६६५ मराठा स्वराज्य पुणे परगण्यातील डोंगरी किल्ला पुरंदर, ज्याला मुघल फौजेनं वेढा घातला आहे.
या वेढ्यात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेला क्रूर सरदार दिलेरखान आणि त्याला तोडीस तोड प्रसिद्ध मोठा
नावलौकिक असलेले राजपूत सरदार मिर्झाराजे जयसिंग त्यांचे नेतृत्व करताहेत. बाळसं धारण करू लागलेल्या
मराठा साम्राज्याला सगळं काही गंगार्पण होईलसं वाटत होते. शिवाजी राजे सगळ्या बाजूंनी वेढले गेले होते,
अभेद्य मुघल फौजेला कसं तोंड द्यायचं आणि यातून सहीसलामत बाहेर कसं याबाबत खलबतखाना सुरू असतो.
खुद्द राजेच पन्हाळगडावर अडकले होते. प्रसंग बाका होता; मात्र आणीबाणीत धाडसी पाऊल उचलणं गरजेचं
असतं. रात्रीच्या भयाण अंधाराला चिरत, थेट शत्रूच्या नाकासमोरून त्यांची सुटका करण्याच्या हेतूनं एक नामी
पण अत्यंत धोकादायक योजना आखली गेली. तिथनं ते सहीसलामत निसटून विशाळगडावर कसे पोचले याची
चित्तथरारक कथा आणि त्या अनुषंगानं येणारी मुघल फौजेला नेस्तनाबूत करत-त्यांचा पुरता धुव्वा उडवत
दिलेली उंबरखिंडीच्या लढाईची कथा; हा मध्यवर्ती गाभा. ही कथा उलगडते तीच मुळी शिवाजी राजांचे
प्रसिद्ध गुप्तहेर बहिर्जी-नाईक यांच्या नजरेतून. ज्या लढाईला पुढं गनिमी काव्याचं मोठं उदाहरण म्हणून पाहिलं
जाऊ लागलं, तीच ही लढाई. दरम्यान प्रस्तुत कथेत गुप्तहेर स्वराज्यात सामील होण्यापासून ते त्यांची नामी
कामगिरी आणि त्यातून त्यांची मुख्य हेर होण्यापर्यंतची पदोन्नती यात वर्णिली आहे.
मात्र राज्यकारभार करताना मात्र राज्यकारभार करताना हमरस्ता सोडूनही वावरावं लागतं.
याच नियमाप्रमाणे सगळ्या लढाया युद्धभूमीवर न लढता तह करून सोडवायच्या असतात. त्यानुसार जणू
काही सारं आलबेल आहे-शांत आहे हे स्थापित करण्यासाठी पुरंदरचा तह ही एक मुत्सद्देगिरी ठरली. मात्र
शत्रूला आलबेल वाटत असलं तरी काहीतरी शिजत मात्र नक्कीच होतं. त्याचंच नाट्य पुढं सरसावलं. बादशहा
आलमगीर औरंगजेबने शिवाजी राजांना त्यांच्या दरबारात आग्र्याला हजर होण्याचा हुकूम दिला. पण शत्रूच्या
मनातील डाव न ओळखणारे शिवाजीराजे आणि त्यांचं गुप्तहेर खातंही काही लेचंपेचं नव्हतं. हे आजही
आपल्याला महाराजांची आग्र्याहून सुटका वाचताना जाणवतं. मुघलांच्या राजधानीला भेट देणाऱ्या
मराठ्यांच्या छत्रपतींना नुसतं सुरक्षित ठेवणंच नाही तर वाघाच्या जबड्यातून त्यांना बाहेर काढून मायदेशी
सुखरूप परत आणणं ही अत्यंत कठीण कामगिरी गुप्तेहरांसमोर होती, आणि इथंच तिसऱ्या पुस्तकाची पार्श्वभूमी
तयार होते.
कादंबरी उचित परिणामकारक ठरते त्यामागचं कारण असं वाटतं की योग्य पात्ररचना, संवाद यांची सुलभ
रचना. सत्यघटनांना धक्का न लावता पण काहीच काल्पनिक पात्रांच्या आधारे त्या काळात घेऊन जाणारी
ओघवत्या भाषेतील, अजिबात शब्दबंबाळ नसलेली ही कादंबरी संयतपणे पुढं सरकत राहते, सलग वाचावी
इतकं नेटकं लेखन. छत्रपती शिवाजी महाराज, नेतोजी पालकर, मोरोपंत, निकोलाओ मनुची, दाऊदखान आणि
मिर्झाराजे ही सगळी खरी ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे आहेत. शशीध्वज, तुफानखान आणि मुबारकखान या
काल्पनिक व्यक्तिरेखा आहेत. एका व्यक्तीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, निकोलाओ मनुची याचा. तो
इटालियन होता. वयाच्या चौदाव्या वर्षी घरातून पळून आलेला होता आणि उर्वरित आयुष्य त्याने भारतात
घालवले. पन्हाळ्यावरील हल्ला आणि वेढा यामधील बहुरंगी पात्र तो आहे. आणि या पुस्तकातला महत्त्वाचा
भाग आहे. त्याने या कालखंडाच्या नोंदी त्याच्या आत्मचरित्रात (अ पीप ऑफ मॉडर्न इंडिया) केल्या आहेत.
बाकी घटना, पात्रे समजण्यासाठी पुस्तक मुळातून वाचण्याशिवाय पर्याय नाही. विशेष उल्लेखनीय म्हणजे
योगिता रिसबूड यांचा अनुवादही त्याच तोडीचा.
रेल्वेचे विद्युतीकरण करण्याच्या कामातले भारतातील सर्वात तरुण आणि निपुण तज्ज्ञ, याशिवाय युट्युबर,
श्रेयस अँड स्निकर्स या संगीत समूहाचे नेतृत्व करणारे, गाणी लिहिणे ती संगीतबद्ध करणे, स्केचिंग, वॉटर कलर
चित्रे काढण्याची आवड, गिटारिस्ट, गिर्यारोहक आणि लेखक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले लेखक श्रेयस
भावे, त्यांच्या मनातील बहिर्जी बांदल-सदाशिव नाईक ही जोडगोळी की एकच व्यक्ती, याला न्याय देत काही
काल्पनिक पात्रांच्या आधारे शिवाजीमहाराजांच्या आयुष्यातील काही महत्त्वपूर्ण घटना गुप्तहेरांच्या नजतेतून
वाचकांसमोर आणण्यात ते यशस्वी झाले आहेत. (त्यांच्या मते आग्र्याहून महाराजांची सुटका ही काही
साधीसुधी गोष्ट नव्हती, त्यामुळे गुप्तहेर म्हणून बहिर्जी ही एकच व्यक्ती हे अत्यंत जोखमीची आणि अवघड
कामगिरी पार पाडू शकण्याची शक्यता कमी वाटते तसंच ते अनेक भाष्यकारांनाही वाटतं) लेखक याबद्दल जे
स्पष्टीकरण कोणताही आडपडदा न ठेवता देतात, पुस्तकात बहिर्जी-नाईक ही द्वयी मानवी गुणावगुणांनी युक्त
आणि विश्वासपात्र दाखवली आहे. त्यांना खऱ्या जीवनात अस्तित्वात नसणारी पण दंतकथेत असणारी,
अविश्वसनीय अशी सर्व कामं करणारी, दैवी शक्ती वगैरे दाखवलेली नाही, हे पात्र रंगवणे धाडसी असले तरी
वास्तविकतेवरचा विश्वास वाढवणारं ठरतं; जे आज इतिहासाची तोडमोड करण्याच्या, दैवी शक्तीला मुलामा
चढवला जाण्याच्या काळात महत्त्वपूर्ण ठरतं. त्याबद्दल लेखकाचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप
खूप शुभेच्छा!
एक महत्त्वपूर्ण कादंबरी वाचकांच्या हाती दिल्याबद्दल दिलीपराज प्रकाशन प्रा.लि., पुणे यांचे विशेष आभार!
पूनम बा. मं., पुणे
मोबा. ९४२३०८०२२४